(Shirur Crime) शिरूर : केंदूर (ता. शिरुर) गावची रामनवमी निमित्त यात्रा असतानाच, गावचे माजी उपसरपंचाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत गोंधळ घातला व पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी उपसरपंचा विरुद्ध विविध गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
राजेंद्र हिरालाल ताठे (वय-४२, रा. केंदूर, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत अशोक कुंजीर (रा. शिक्रापूर. ता. शिरुर) यांनी सरकारच्या वतीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
वाजेवाडी (ता. शिरुर) येथील चौफुला येथे काही इसम दारु पिऊन गोंधळ घालत आहेत. अशी माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस नाईक हेमंत कुंजीर व संतोष शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता, त्या ठिकाणी ३ व्यक्ती गोंधळ घालताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, केंदूरचे माजी उपसरपंच राजेंद्र ताठे हे पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून येत दमदाटी करु लागले. तेव्हा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस नाईक हेमंत कुंजीर, संतोष शिंदे, पोलीस शिपाई स्वप्नील गांडेकर, अंकुश चौधरी हे ताठे यांना समजावून सांगत होते.
मात्र माजी उपसरपंच राजेंद्र ताठे हे पोलिसांच्या अंगावर धावून जात होते. पोलिसांना धक्काबुक्की करत गोंधळ घालू लागले, याच वेळी राजेंद्र ताठे यांनी पोलीस ठाण्यामधील कपाटाची काच फोडली.
याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र ताठे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur Crime : गाडी सावकाश चालवा असे म्हणल्याच्या रागातून तिघांनी दिली एकाची दुचाकी पेटवून..!