प्रतिनिधी : अमित मुंडीक
Pune : पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-4 पथकाने अटक केली आहे. संतोष सुरेश भालेराव (वय 21, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) आणि आकाश ऊर्फ आक्की संतोष देवकर (वय 20, रा. मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार गंभीर गुन्हे तसेच मोक्का प्रकरणांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत 7 मार्च 2026 रोजी युनिट-4 गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या.
गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि वैभव रणपिसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संतोष भालेराव हा आकुर्डी येथील रमाईनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
तसेच दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार विशाल इथापे आणि नागेशसिंग कुंवर यांना मिळालेल्या माहितीवरून आकाश ऊर्फ आक्की देवकर हा औंध येथील इंदिरा वसाहत परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यालाही अटक केली.
चौकशीत दोन्ही आरोपी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 469/2024 मध्ये भा.द.वि. कलम 397, 364(अ), 506 तसेच शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत वाँटेड असल्याचे समोर आले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम आणि त्यांच्या पथकाने केली.







