पुणे: पतीशी पटत नसल्यामुळे दोन मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातून पुण्यात आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा तिच्या प्रियकराने संशयातून निर्घृण खून केला. या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या १५ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षीय मुलालाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना चाकणजवळील खराबवाडी येथे घडली. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

अटक केलेल्याचे नाव सचिन रामआसरे यादव (वय २३, रा. चाकण, ता. खेड, मूळ रा. चंपापूर, ता. हडिया, जि. अलाहाबाद) असे आहे, तर खून झालेल्या महिलेचे नाव अंतिमा पांडे (वय ३६, रा. खराबवाडी, ता. खेड) असे आहे.
ही थरारक घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता ओंकार खराबी यांच्या खोलीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिमा पांडे हिचे पतीशी पटत नव्हते, त्यामुळे ती आपल्या मुलगा-मुलीसह पुण्यात आली होती. चाकणमधील एका कंपनीत काम करत असताना तिची ओळख सचिन यादव याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
मात्र, काही महिन्यांतच सचिन यादव याने अंतिमा पांडेवर संशय घेणे सुरू केले. ती घराबाहेर उभी राहून इतर पुरुषांकडे पाहते, असा संशय घेत त्याने वारंवार भांडणं केली आणि मारहाण केली. १५ दिवसांपूर्वीच लाकडी लाटणे आणि पीव्हीसी पाईपने तिला मारहाण केली होती.
५ ऑगस्ट रोजी दिवसभर तो तिच्या घरीच होता. संध्याकाळी दोघांत पुन्हा वाद झाला आणि त्याने प्लास्टिक स्टूल, लाकडी लाटणे, पीव्हीसी पाईप व लाकडी काठीने तिच्या दोन्ही पायांवर, हातांवर आणि डोक्यावर मारहाण केली. यानंतर तिच्या पोटावर चाकू लावत, “आज तुला ठार मारतो” अशी धमकी देऊन तिचा खून केला. आईला वाचवण्यासाठी तिचे दोन्ही मुलं पुढे आले असता, आरोपीने मुलाच्या पाठीत लाटण्याने मारहाण केली आणि दोघांनाही दमदाटी केली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन यादव याला अटक केली. मुलीच्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाय करीत आहेत.







