पुणे : आरोपीला गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी व आरोपीच्या बाजूने अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या कराड (जि. सातारा) शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला न्यायालयाने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर व पोलीस हवालदार रमेश शामराव ढमढेरे अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, पोलीस हवालदार रमेश ढमढेरे हे सन 2016 साली कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी 4 जणांवर जुगार अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंड करून सोडून दिले होते. जुगाराच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना केलेल्या मदतीच्या मोबदल्यात पोलीस हवालदार रमेश ढमढेरे यांनी एका आरोपीकडे 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत पोलीस हवालदार रमेश ढमढेरे यांना 1 हजार रुपयांची लाच रंगेहाथ स्वीकारली होती. याप्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजु बानसिंग चव्हाण यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात रमेश ढमढेरे दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने रमेश ढमढेरे यांना 3 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त कारावास तसेच कलम 13 (1) ड सह 13 (2) अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दुसऱ्या घटनेत, कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत होळकर यांनी आरोपीच्या बाजूने अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तक्रारदार यांच्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालिन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात भरत होळकर दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने 1 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास तसेच कलम 13 (1) ड सह 13(2) अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.







