पुणे : आज पहाटे भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात तर त्यांच्या सहकाऱ्यांना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार जयकुमार गोरे यांचे वडिल भगवान गोरे यांनी या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा घातपात असू शकतो,’ अशी शंका भगवान गोरे यांनी व्यक्त केली आहे. भगवान गोरे यांनी सकाळी जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“सकाळी मला फलठण येथून फोन आला. गाडीत काय झाले असेल हे मला माहित नाही. अपघात झाला तेव्हा या पुलावर वाहतुक नव्हती. त्यामुळे मला शंका वाटते. अपघात झाला त्या ठिकाणी मी गेलो होतो, त्याठिकाणी अपघात होण्यासारखे काही नाही, पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी ? त्यामुळे घातपाताची शंका आहे. हे फलटणमध्येच घडतयं म्हणून मला शंका आहे. पण माझा कुणावरही संशय नाही,” असे भगवान गोरे यांनी पत्रकारांना सांगितले
आमदार गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल रुग्णालयातील न्युरो ड्रॉमा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल गंगाधर झिरपे यांनी दिली आहे.