Latur : लातूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. या कटासाठी त्याने रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून केला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री एक स्कोडा कार अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली होती. या गाडीत चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. कारमध्ये सापडलेल्या वस्तूंवरून हा मृतदेह औसा तांडा येथील गणेश चव्हाण याचा असल्याचा अंदाज बांधण्यात आला. (latur)
मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच हा अपघात संशयास्पद वाटत होता. तपासादरम्यान गणेश चव्हाणचे कॉल डिटेल्स तपासले असता महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. चौकशी पुढे गेल्यावर धक्कादायक सत्य समोर आलं – गणेश चव्हाण जिवंत होता आणि स्वतःचा मृत्यू दाखवून तो फरार झाला होता.
पोलिस तपासात उघड झालं की, गणेश चव्हाणवर मोठं कर्ज होतं. तो एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होता. आर्थिक अडचणी वाढल्याने त्याने आधी एक कोटी रुपयांचा विमा काढला आणि नंतर स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा कट रचला.
तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणारे गोविंद यादव नावाचे वृद्ध त्याने गाडीत बसवले. पुढे निर्जन ठिकाणी त्यांचा खून करून मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवण्यात आला. त्यानंतर कारला आग लावण्यात आली. आपणच मृत असल्याचं दाखवण्यासाठी आरोपीने स्वतःचे दागिने मृतदेहाजवळ ठेवले होते.
मात्र काही गोष्टी जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. तपास वेगाने करण्यात आला आणि अखेर गणेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात आला. या घटनेत एका निष्पाप वृद्धाचा हकनाक बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खून, फसवणूक आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.







