धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा – पाटोदा चौकात जमिनीच्या वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. भर चौकात पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांची नावे सहदेव पवार आणि प्रियंका पवार अशी आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या जमिनीच्या वादातून पुन्हा कुरापत काढत आरोपींनी प्रथम पती-पत्नीला गाडीने जोरदार धडक दिली. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून दोघांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आरोपी जीवन चव्हाण आणि हरीबा चव्हाण या बाप-लेकासह इतर काही जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मृत सहदेव पवार हा केवळ 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. याआधी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा (कलम 307) गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणातीलच जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहदेव पवार आणि आरोपी यांच्यातील वाद जुना असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
ही हत्या थेट भर चौकात झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनीच्या वादाचा शेवट अशा दुर्दैवी प्रकारात झाल्याने संताप व्यक्त होत असून, या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वादांचे भीषण परिणाम समोर आले आहेत.







