Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगावमध्ये भयंकर घटना घडली केवळ ‘कारल्याची भाजी’ बनवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाने आईची हत्या केली. ३६ वर्षीय जगदीश पेटकुले याने आपली ६५ वर्षीय जन्मदात्री सुमित्राबाई यांची अमानुष हत्या केली. जगदीश पेटकुले याला दारुचं व्यसन होतं. या दारूच्या व्यसनामुळे जगदीशची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. घरी फक्त वृद्ध आई आणि जगदीश होते.

काल रात्री जेवणाच्या वेळी ताटात कारल्याची भाजी पाहून जगदीशचा संताप अनावर झाला. आधीच दारूच्या नशेत धुंद असलेल्या त्याने आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आईने समजावण्याचा प्रयत्न केला, पण नशेत असलेल्या जगदीशला काहीच सुचत नव्हते.रागाच्या भरात त्याने आईला लाथाबुक्क्यांनी आणि जवळ पडलेल्या वस्तूने इतकी अमानुष मारहाण केली की, सुमित्राबाईंचा जागीच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली, तोपर्यंत उशीर झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून संपूर्ण गाव हादरून गेलं.
या प्रकरणात पोलिसांनी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे. मारहाणीपूर्वी नेमका काय वाद झाला, आरोपीची मानसिक अवस्था काय होती आणि त्याच्या व्यसनाधीनतेचा या घटनेशी कितपत संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.
घटनेनंतर डोंगरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. साध्या कौटुंबिक वादातून इतका टोकाचा प्रकार घडल्याने गावकरी स्तब्ध झाले आहेत. शेजाऱ्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबातील मतभेद आणि व्यसनाधीनतेकडे वेळेवर लक्ष न दिल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.







