Crime News : बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, रस्त्याच्या कडेला एका रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष लागलेला नाही.

नेमकं घडलं तरी काय?
मलकापूर तालुक्यातील शिवनी ते तालसवाडा रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. अमोल भाऊराव भवरे (वय 35, रा. धरणगाव) असं मृताचं नाव आहे. प्राथमिक पाहणीत त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या बाजूला टाकून दिल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Crime News)
हत्या की आत्महत्या?
अमोल भवरे हा रिक्षाचालक होता. सकाळच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात गळा आवळल्याचे चिन्ह आढळल्यामुळे हा खूनच असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. मात्र हा प्रकार कोणी आणि का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. अमोल शेवटच्या वेळेस कुणाच्या संपर्कात होता, त्याचं लोकेशन काय होतं, तसेच वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित वाद होते का, या सगळ्या बाजूंनी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी लवकरच आरोपी सापडतील, असं आश्वासन दिलं आहे.
बुलढाणा हादरलं
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात सलग अपघात आणि मृत्यूच्या घटनांमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. आजच दुपारी चार ते पाचच्या सुमारास दुचाकी आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे झाले. या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे.
एकीकडे खुनाची घटना आणि दुसरीकडे भीषण अपघात, यामुळे जिल्ह्यात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.







