Crime News : संसाराचा गाडा ओढताना पत्नीला विश्वासात न घेता काढलेले लाखो रुपयांचे कर्ज आणि त्यानंतर सासरच्या मंडळींकडून सुरू झालेला मानसिक छळ एका विवाहितेच्या जिवावर बेतला आहे. आष्टी तालुक्यातील मेहर गल्ली येथील रुक्मिणी प्रदिप भालेराव या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःला पेटवून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, आष्टी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह पाचa जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कर्जाचा वाद ठरला जीवाघेणा
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रुक्मिणी यांचे पती प्रदिप भालेराव हे नेकपूर येथील एका मुकबधिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रदिप यांनी पत्नीला कोणतीही कल्पना न देता बँकेतून मोठी कर्जाची रक्कम उचलली होती. विशेष म्हणजे, हे पैसे त्यांनी स्वतःच्या बहिणीला जमीन खरेदी करण्यासाठी दिले होते. जेव्हा ही बाब रुक्मिणी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी याबद्दल विचारणा केली, तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात छळाचे सत्र सुरू झाले. पतीला साथ देत नणंद, नंदोवा आणि इतर नातेवाईकांनी त्यांना फोनवरून धमकावण्यास व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
रुग्णालयात सात दिवस मृत्यूशी झुंज
सततच्या अपमान आणि धमक्यांमुळे खचलेल्या रुक्मिणी यांनी १४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत त्या ७० ते ८० टक्के भाजल्या गेल्या होत्या. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी मृताचे भाऊ भागवत डोरले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रदिप भालेराव, नणंद स्वाती सुरवसे, नंदोवा जालींदर सुरवसे, राणी आगलावे आणि गणेश जिरेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. एकीकडे मुकबधिर मुलांच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्या शिक्षकाच्याच घरात असा अंधार पसरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







