प्रतिनिधी अमित मुंडीक
Crime News : सासवड शहरात दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन परप्रांतीय आरोपींना जेरबंद केले आहे. (Crime News)

सासवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७१/२०२५ हा भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मयत राजू दत्तात्रय बोराडे (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा मृतदेह दि. ९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याखाली आढळून आला होता. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मयताचे भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे यांनी फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दोन संशयित इसम मयतासोबत घटनास्थळाकडे जाताना दिसून आले. त्यांचे फोटो विकसित करून सासवड व पुणे शहरातील विविध भागात शोधमोहीम राबविण्यात आली.
तपासादरम्यान सासवड येथील आनंद वाईन्स येथे एक संशयित इसम आढळून आला. चौकशीत त्याने आपले नाव सुरज प्रकाश बलराम निषाद (वय ३४, व्यवसाय बांधकाम मजूर, रा. छत्तीसगड) असे सांगितले. सखोल चौकशीत त्याने साथीदार नीरज ओम प्रकाश गोस्वामी (वय २५, व्यवसाय बांधकाम मजूर, रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले.
आरोपी व मयत एकमेकांच्या ओळखीचे नव्हते. घटनेच्या दिवशी दारू पिण्यावरून वाद झाला. मयताने चाकूचा धाक दाखविल्यानंतर आरोपींनी त्यालाच दारू पाजून घटनास्थळी नेले व त्याच्याच चाकूने गळ्यावर वार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच नीरज गोस्वामी याने यापूर्वी जामखेड येथे झालेल्या एका खूनप्रकरणात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करत आहेत.






