Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात एका ६ महिन्यांच्या गरोदर महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, पहिल्या पतीच्या मृत्यूचे विम्याचे ८० लाख रुपये हडपण्यासाठी हा सगळा छळ सुरू होता. (Crime News)

नेमकं प्रकरण काय? मयत विवाहितेचे नाव पल्लवी गोपाल सहाने (३० वर्ष) असं आहे. पल्लवीचा पहिला विवाह २०१५ मध्ये झाला होता, पण २०२१ मध्ये एका अपघातात तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला. पहिल्या पतीपासून तिला एक ६ वर्षांची मुलगी (इंद्रायणी) आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर ती माहेरी राहत होती. पल्लवीच्या घरच्यांनी जुलै २०२४ मध्ये तिचं दुसरं लग्न गोपाल सहाने याच्याशी लावून दिलं.
पैशांचा हव्यास अन् छळ पल्लवीला पहिल्या पतीच्या विम्याचे ८० लाख रुपये मिळणार आहेत, हे समजताच पतीने आणि सासरच्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली. पल्लवीच्या पैशातून पतीने ट्रॅक्टर आणि गाडीसाठी ११ लाख घेतले, तर घरासाठी म्हणून आतापर्यंत जवळपास ३० ते ३५ लाख रुपये काढून घेतले. एवढं होऊनही सासरच्यांची भूक मिटली नाही. नणंदेच्या लग्नासाठी १० लाख दिले, तरीही दुसरी नणंद आणि नणंदोई घर बांधण्यासाठी अजून २० लाखांची मागणी करत पल्लवीला त्रास देत होते.
पोटात बाळ असतानाही मारहाण पल्लवी ६ महिन्यांची गरोदर होती, तरीही पैशांसाठी तिला निर्दयीपणे मारहाण केली जात होती. आईवर होणारा हा सगळा अन्याय तिची ६ वर्षांची छोटी मुलगी इंद्रायणी डोळ्यांनी पाहत होती. तिने अनेकदा आपल्या आजीला फोन करून सांगितलं होतं की, “आईला खूप मारतात.”

शेवटी टोकाचं पाऊल उचललं १२ जानेवारीला पुन्हा एकदा पैशावरून वाद झाला आणि तिला अमानुष मारहाण करण्यात आली. सततचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास पल्लवीने ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
पल्लवीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आता पोलिसांनी पती गोपाल सहाने, नणंद कविता चिकटे, अर्चना जाधव, नणंदोई किशोर जाधव आणि दीर समाधान चिकटे अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






