Crime : कोल्हापूर शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत असताना सोमवारी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक खुनाने शहरात खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील उचगाव (मणेरमळा परिसर) येथे रविवारी रात्री प्रशांत बाबुराव पंडित (वय 38, रा. महालक्ष्मीनगर, उजाळाइवाडी) यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी पंडित यांच्या डोक्यावर आणि तोंडावर दगडाने वार करून त्यांचा खून केला. यादववाडीतील जय हनुमान मित्रमंडळाच्या खोलीमागे सोमवारी सकाळी त्यांचा गंभीर जखमी आणि नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
प्रशांत पंडित हे मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते आणि रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. मृतदेहावर अनेक गंभीर जखमांचे निशाण आढळल्याने हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून संशयितांची चौकशीही सुरू आहे. खुनामागे वैयक्तिक वैर, आर्थिक कारणे किंवा रिक्षा स्टॉपच्या स्थानिक वादाचा संबंध असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.
दरम्यान, या घटनेच्या काही तासांपूर्वीच रविवारी सायंकाळी राजारामपुरी परिसरात सख्ख्या भावाच्या हत्येची घटना घडली होती. एका दिवसात शहरात 2 खुनांच्या घटना घडल्यामुळे कोल्हापूरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी शहरात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.







