Crime : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना आता उघड झाली आहे. शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ७२ वर्षीय उषा मारुती भिऊंगडे यांचा मृत्यू सुरुवातीला संशयास्पद वाटत होता; मात्र तपासाअंती तो खून असल्याचे स्पष्ट झाले. आणि सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे हा खून त्यांच्या चुलत नातवाने प्रेम परशुराम भिऊंगडे (२०) चैनीसाठी केला.

उषा यांचे पती मारुती भिऊंगडे यांचे ३० डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले होते. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. पुतण्या परशुराम त्यांची देखभाल करत होते. १६ फेब्रुवारीला सकाळी त्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या. प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू वाटला नाही. शेजाऱ्यांच्या माहितीतून आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
प्रेम त्या सकाळी फ्लॅटवर गेला होता. चौकशीत उघड झाले की, त्याने चहात सोनारकामात वापरली जाणारी विषारी पावडर मिसळून आजीला दिली. विश्वासाने चहा पिल्यानंतर त्यांना अस्वस्थता आली आणि त्या कोसळल्या. मृत्यूची खात्री झाल्यावर प्रेमने दहा तोळ्यांचे दागिने घेऊन पलायन केले. काही दिवसांनी तो ताब्यात आला आणि गुन्ह्याची कबुली दिली.






