Crime : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने विश्वास, लोभ आणि आर्थिक ताण यांचा धोकादायक संगम पुन्हा एकदा समोर आणला आहे. हांडे वस्ती परिसरात 73 वर्षीय गंगुबाई कालिदास गडदे यांचा खून त्यांच्या स्वतःच्या भाडेकरूने केल्याची बाब उघड झाली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे.

गंगुबाई या आपल्या जुन्या वाड्यात एकट्याच राहत होत्या. अनेक वर्षांपासून ओळखीचा आणि विश्वासू मानला जाणारा 35 वर्षीय चांगदेव गोवर्धन पाटील हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चांगदेवला शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने गंगुबाई यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवत थेट खुनाचा कट रचला.
25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1.30 च्या दरम्यान त्याने गंगुबाईंना आपल्या खोलीत बोलावले. त्यांना पेयामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून केला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून कारमधून दुसरीकडे नेऊन विल्हेवाट लावल्याची कबुली त्याने दिली आहे.
या प्रकरणाचा उलगडा तक्रार आणि सीसीटीव्हीच्या मदतीने झाला. 27 मार्च रोजी नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात संशयित आरोपी पीडितेच्या मागावर असल्याचे दिसून आले. त्यानंतर चौकशीत सत्य बाहेर आले.







