Crime : मंगळवेढा तालुक्यातील एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धनश्री संदीप जगताप यांच्या मृत्यूला 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही सर्व आरोपींना अटक का झाली नाही, असा सवाल तिच्या माहेरच्यांनी उपस्थित केला आहे. पतीला अटक करण्यात आली असली तरी सासू-सासरे अद्याप फरार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील रहिवासी आप्पासो श्रीरंग मोरे यांची मुलगी धनश्री हिचा विवाह संदीप गौतम जगताप याच्याशी झाला होता. 4 मार्च 2026 रोजी धनश्रीचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर 7 मार्च रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती संदीप जगताप याला अटक केली असली तरी सासरे गौतम दाजी जगताप आणि सासू रंजना गौतम जगताप यांना अद्याप अटक झालेली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
धनश्रीचे वडील आप्पासो मोरे यांनी 14 मार्च रोजी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात आणखी गंभीर आरोप केले आहेत. धनश्रीचा दीर सत्यजित गौतम जगताप हा पोलीस खात्यात कार्यरत असून त्याच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्याच्याविरोधात तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. धनश्रीचा मोबाईल घरातच राहिला असताना ती विहिरीकडे कशी गेली, विहिरीत सुमारे 20 फूट पाणी असताना तिचा मृतदेह बाहेर कसा काढला, तसेच आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन का तपासले जात नाहीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
धनश्रीच्या मोबाईलमध्ये पतीकडून होत असलेल्या छळाचे पुरावे असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र त्याची सखोल तपासणी झाली नसल्याची त्यांची तक्रार आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी सर्व आरोपींना अटक करून निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी धनश्रीच्या कुटुंबीयांनी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.







