बीड: आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने घडवलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर महामार्गावर जातेगाव फाट्यानजीक घडली. मृत व्यक्तीची ओळख नितीन शेळके असे असून, तो त्या परिसरातील रहिवासी होता.

प्राथमिक माहितीनुसार, सागर धस सोमवारी रात्री आपल्या चारचाकी वाहनातून पुण्याकडे जात होता. दरम्यान, जातेगाव फाट्याजवळून एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत असताना सागरच्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की नितीन शेळके काही मीटर दूर फेकला गेला. घटनेनंतर स्थानिकांनी आणि अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने गंभीर जखमी अवस्थेत नितीनला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल केल्यानंतर मृत घोषित केलं.

हा अपघात इतका भयावह होता की परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर रक्ताचे डाग आणि दुचाकीचा चक्काचूर झालेला अवस्थेतील अवशेष पाहून अनेकांनी धसकाच घेतला. घटनेनंतर सागर धस काही वेळ घटनास्थळी थांबला होता, मात्र पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अपघाताचा पंचनामा करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा तपास सुरू असून वाहनाची गती, वाहनचालकाचा निष्काळजीपणा आणि इतर कारणांची तपासणी केली जात आहे. सागर धस विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.







