पुणे : बीड जिल्ह्यातील केज येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे, म्हणजेच सौरभ सोनवणेचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राजकीय दृष्ट्याही जास्त तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी केला आहे

विलास घुले यांच्या हत्येला १५ दिवस पूर्ण झाले असूनही पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र असंतोष आहे. न्याय मिळवण्यासाठी केज शहरात एक विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान प्रामुख्याने खासदार पुत्र सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच गुन्ह्यातील सर्व आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई व्हावी.
खासदार बजरंग सोनवणे आपल्या पदाचा गैरवापर करून मुलाचा बचाव करत असल्याचा आरोप फेटाळला जावा आणि सखोल तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मृत विलास घुले यांच्यावर जेव्हा जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा आरोपी सौरभ सोनवणे याचे नाव घेत होते, असा धक्कादायक दावा घुले यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पुरवणी जबाबात नाव नोंदवूनही सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, वाढत्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास आता एसआयटी (SIT) कडे सोपवण्यात आला असून, त्यांनी सौरभ सोनवणेची चौकशी देखील केली आहे.
हत्येनंतर घुले कुटुंबियांनी केज पोलीस ठाण्यासमोर तब्बल ११ तास ठिय्या आंदोलन केले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनवरून कुटुंबाशी संवाद साधून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या मध्यस्थीनंतरच नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले आणि विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
सध्या या संवेदनशील प्रकरणावर राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्याचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.






