दौंड, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर चारचाकीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक पादचारी व्यक्ती जखमी झाला आहे. हि घटना कुरकुंभ (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (ता. १६) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

बाळू बबन जाधव (वय – ४९, रा. साळुंखेवस्ती कुरकुंभ, ता. दौंड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अनोळखी पादचारी चारचाकीची धडक बसल्याने जखमी झाले. त्याचे नाव व पत्ता अद्याप मिळू शकला नाही. याप्रकरणी किरण शिवाजी जाधव (रा. मळद, ता. दौंड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अपघातातील चारचाकी चालक विजय नामदेव चव्हाण (रा. सिध्दीविनायक सोसायटी, फेज १. वारुळवाडी, नारायणगाव ता. जुन्नर) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून एक मृत्यू व एक जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.







