
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी गावात ३० मे रोजी रात्री साडे नऊ वाजता एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतजमिनीसाठी जन्मदात्या वृद्ध आईचा खून तिच्या मुलाने बायकोच्या मदतीने केला. मृतक महिलेचे नाव लक्ष्मी महाडिक (वय ३२ वर्षे) आहे. या खून प्रकरणात दत्तात्रय महाडिक (मुलगा), रजनी महाडिक (सून) आणि धर्मराज बागल (व्याही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

वाढलेले वाद आणि शेतीसाठी हत्या

माहितीनुसार, लक्ष्मी महाडिक यांच्याकडे आठ एकर शेती होती. त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पतीचे १० महिन्यांपूर्वी पूर्वी निधन झाले होते, तर मुलगी ऑस्ट्रेलियात राहते. लक्ष्मी महाडिक आणि त्यांचा मुलगा तसेच सून यांच्यात शेतीवरून वारंवार वाद होत होते. म्हणूनच, लक्ष्मी वेगळी राहात होत्या. मुलगा शेजारी पक्क्या घरात राहत होता, तर लक्ष्मी पत्र्याच्या शेडमध्ये एकटीच राहत होत्या. अंदाजे सहा महिन्यांपूर्वी देखील मुलगा, सून आणि सुनेचे वडील यांनी लक्ष्मी महाडिक यांना ऊसाच्या शेतात मारहाण केली होती.
मुलीने केला ऑस्ट्रेलियावरून फोन
लक्ष्मी महाडिक यांची मुलगी कल्पना जी ऑस्ट्रेलियात राहते, तिने आपल्या आतेभावाला फोन करून सांगितले की, “आईला शेतात मारून टाकले आहे, तू जाऊन बघ.” त्यानंतर आतेभाऊ मारुती रेवडे घरी पोहोचले तेव्हा लक्ष्मी महाडिक यांच्या घराच्या आसपास त्याने प्रचंड गर्दी पाहिली. मारुती रेवडे यांना लक्ष्मी महाडिक शेतात रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते, गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर व डोक्यावर दगडाने मारल्याच्या खुणा होत्या.
पोलिसांचा तपास सुरू
सोलापूर पोलिसांनी दत्तात्रय महाडिक, रजनी महाडिक आणि धर्मराज बागल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत, आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.







