लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरून रस्ता ओलांडणाऱ्या 62 वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेला भरधाव इलेक्ट्रिक कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर येथील शौर्य हॉस्टेलसमोर 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

लताबाई दत्तात्रय रासकर (रा. माळीमळा, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई रासकर या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्या शौर्य हॉस्टेलसमोर सुरक्षा रक्षकासोबत पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कर्व ईव्ही कारने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी त्यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील शांताई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या छातीला तसेच दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना 5 ऑक्टोबर रोजी फुरसुंगी येथील शिवम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या अपघातानंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार व इतर विधी पूर्ण केल्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचा क्रमांक एमएच 16 डीडब्ल्यू 9107 असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. महामार्गावर रस्ता ओलांडताना झालेल्या या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






