सोलापूर: आगामी (Solapur Politics) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आजी आणि माजी नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू खरे (शरद पवार गट) यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार खरे यांनी यशवंत माने यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला, “यशवंत माने हा मूर्ख माणूस आहे, दारू पितो की गांजा पितो काय कळत नाही, त्यामुळेच तो नेहमी बेताल वक्तव्य करतो,” अशा भाषेत राजू खरे यांनी माने यांच्यावर निशाणा साधला आहे.
विद्यमान आमदार राजू खरे यांनी भाजप नेते राजन पाटील यांनाही चॅलेंज दिले आहे. “आगामी निवडणुकीत सर्वच नेत्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार आणि त्या पाटलाची उरली सुरली पाटीलकी काढू,” असा थेट इशारा त्यांनी राजन पाटील यांना दिला आहे. सोलापूरच्या स्थानिक राजकारणात त्यामुळे आता मोठी राजकीय धुळवड उडण्याची शक्यता आहे.







