सोलापूर: सोलापूर (Sex Determination) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पोलिसांनी एका धावत्या कारमध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश केला आहे. जामगाव परिसरात एका आलिशान गाडीत बेकायदेशीर कृत्य चालत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून कार अडवली आणि झडती घेतली असता, कारमध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी अजित सुरेश मस्तूद नावाच्या बोगस डॉक्टरला अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या कारवाईत सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली महागडी कार, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य सापडले आहे. झडतीदरम्यान रक्ताने माखलेली औषधे आणि प्रतिबंधित गोळ्याही पोलिसांना आढळल्या, ज्यावरून तिथे गर्भपातासारखे गंभीर गुन्हे केले जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अटक केलेल्या बोगस डॉक्टरवर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट नेमके कुठपर्यंत पसरले आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.







