करमाळा, ता. 27: जिंती (ता. करमाळा ) (Karmala News) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उमेश राजू शेलार (वय-34) यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता.27) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश शेलार हे गुरुवारी सकाळी काही नागरिकांना जिंती गावात फिरताना आढळून आले होते. त्यानंतर शेलार हे घरी गेले होते. त्यांनी घराचा दरवाजा आतून लावला होता. दरम्यान, शेलार यांची मावशी उमेश शेलार यांना घराच्या बाहेरून आवाज देत होत्या. दरवाजा मोठमोठ्याने वाजविला. परंतु, उमेश हे आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हते.
त्यानंतर नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आत मध्ये जाऊन पहिले असता, उमेश यांचा मृतदेह साडीने गळफास घेऊन अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी उमेश यांचा निपचीत अवस्थेतील मृतदेह खाली घेतला. व या घटनेची माहिती त्वरित करमाळा पोलिसांना दिली आहे. परंतु, अद्यापपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.
उमेश शेलार हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. उमेश हे सर्वांना मदत करत होते. परंतु, उमेश यांनी आत्महत्येसारखे एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उमेश शेलार यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, उमेश शेलार यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. मात्र त्यांची आत्महत्या नागरिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.







