गडचिरोली: गडचिरोलीसारख्या (Gadchiroli News) अतिदुर्ग आणि आदिवासी (Vidarbh News) बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ या उपक्रमांतर्गत दहावी सराव परीक्षा चाचणी आज यशस्वीरीत्या पार पडली. जिल्ह्यातील ‘एक गाव एक वाचनालय’ योजनेअंतर्गत चालू असलेल्या 73 वाचनालय केंद्रांमध्ये तसेच पोलीस मुख्यालयातील शहिद पांडू अलार्म सभागृहात एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात आली. या सराव चाचणीस जिल्ह्यातील 3800 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक भाग दुर्गम असल्यामुळे वाहतूक, इंटरनेट आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव जाणवतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांत मागे राहण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये कायम होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबद्दलची जिज्ञासा वाढवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने मुंबईतील यशोधा स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीजच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू केला. आतापर्यंत झालेल्या दहा टेस्ट सिरीजमध्ये एकूण 33750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
आजच्या चाचणीतील विशेष बाब म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात तब्बल 2050 विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. परिसरात विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, परीक्षा सुरू होण्यापूर्वीचे चर्चासत्र आणि पोलीस दलाची काटेकोर व्यवस्था यामुळे येथे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. भामरागड, अहेरी, ऐटापल्ली, हेडरी आणि सिरोंचा या अतिदुर्ग भागांतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी इंटरनेट आणि वीज सुविधा अपुऱ्या असूनही विद्यार्थी तासन-तास पायी चालत वाचनालयांमध्ये पोहोचले.
नुकत्याच स्थापन झालेल्या पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात पंधरा विद्यार्थ्यांनी तर नेलगुंडा पोलीस ठाण्यात दहा विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा दिली. वांगेतुरी येथेही नव्याने सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पहिल्यांदा सराव परीक्षा घेण्यात आली आणि 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.







