नागपूर: नागपूर शहरात महापालिका (Nagpur News) निवडणुकीची धामधूम संपताच शनिवारी पहाटे आयकर विभागाने सुपारी व्यापारावर मोठी कारवाई करत (Nagpur Crime) संपूर्ण व्यापारी वर्तुळात खळबळ उडवून दिली. शहरातील 20 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून आयकर विभागाच्या पथकाने सुपारी व्यापारी, त्यांची गोदामे, कार्यालये आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची झाडाझडती सुरू केली. (Latest Marathi News)

नागपूर हे मध्य भारतातील सुपारी व्यापाराचं प्रमुख केंद्र मानलं जातं. येथून संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा पुरवठा होतो. विशेषतः निकृष्ट आणि सडलेल्या सुपारीचा वापर मावा, तंबाखू आणि गुटखा उत्पादनासाठी होत असल्याचे अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा तयार होत असल्याचा संशय आयकर विभागाला आहे.
या कारवाईत सुपारी व्यापारात चर्चेत असलेले राजू अण्णा उर्फ राजेश शिनॉय, अलताफ कलीवाला, आसिफ कलीवाला, गनी कलीवाला यांच्यासह काही ट्रान्सपोर्टर्स आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. शांतिनगर आणि कामठी रोड परिसरातील राजू अण्णा यांच्या निवासस्थानी झडती सुरू असून, कलीवाला बंधूंच्या कार्यालये आणि गोदामांमध्येही तपास केला जात आहे. कळमना परिसर आणि मां उमिया इंडस्ट्रियल एरिया येथील सुपारी गोदामांमध्येही कागदपत्रे, रोख व्यवहार आणि मालसाठ्याची चौकशी सुरू आहे.
जागनाथ बुधवारी आणि इतवारी परिसरातील सुपारी दुकानांवर आयकर पथक पोहोचताच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. कारवाईदरम्यान एके-47 शस्त्रधारी जवान, डॉग स्क्वॉड आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील सुपारी व्यापारी फारूक भाई यांच्याशी असलेल्या कथित आर्थिक व्यवहारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. करचुकवेगिरी, बनावट बिलिंग आणि देशभर पसरलेलं आर्थिक जाळं उघडकीस आणण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या आयकर विभाग अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी आकडेवारी आणि जप्तीचा तपशील समोर येणार आहे. मात्र या छाप्यांमुळे नागपूरच्या सुपारी व्यापाराचं काळं अर्थकारण उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







