Crime News : वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातून महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खानापूर गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना 28 मार्चच्या मध्यरात्री घडली असून या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारील गावातील एक 19 वर्षीय तरुण 28 मार्चच्या रात्री पीडित मुलीला भेटण्यासाठी खानापूर येथे आला होता. रात्री 11 वाजेच्या सुमारास मुलीचे वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले असता त्यांना मुलगी आपल्या खोलीत दिसली नाही. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला असता, घराच्या अंगणातच मुलगी आणि तो तरुण आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. घाबरलेल्या मुलीने रडत आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्या तरुणाने आपल्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने नमूद केले.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना केली आणि आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. कारंजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.







