Accident News : छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावर नंद्राबाद गावाजवळ बुधवारी दुपारी सुमारे 4.30 वाजता भीषण अपघात (Accident) झाला. आठवडी बाजारासाठी निघालेल्या एका कुटुंबावर हा अपघात ओढवला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दीड वर्षांच्या मुलाचाही काही वेळाने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात किशोर छबुलाल सोनवणे वय 37, रा. रायपूर-डोणगाव, ता. गंगापूर, सध्या कागजीपुरा येथील रहिवासी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा शिवा वय 1.5 वर्ष हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पत्नी पूजा सोनवणे वय 27 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे कुटुंब खुलताबाद येथील आठवडी बाजारासाठी दुचाकीवरून जात होते. नंद्राबाद गावाजवळील वळणावर एमएच 21 बीएच 4338 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही बाप-लेकाला वाचवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ट्रक चालक अपघातानंतर वाहन जागीच सोडून फरार झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका साध्या प्रवासात दोन जीव गमावल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.







