नाशिक: नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केल्याप्रकरणी तब्बल 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला नोकरीसाठी शिफारस करून ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली आहे’ अशी उपकाराची भावना निर्माण केली गेली. त्यानंतर कामाच्या सुट्टीच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना विविध रिसॉर्ट्सवर नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
इतकेच नाही तर, महिलांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, त्यांच्या शरीराकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे धक्कादायक प्रकारही या कंपनीत सुरू होते.
नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुरुवातीला कमालीची गोपनीयता पाळली होती. 25 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 9 गुन्हे मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या 5 संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.







