Mumbai Nashik Highway: नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका भाजपच्या खासदारांच्या आलिशान कारला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की काही वेळातच कोट्यवधी रुपयांची कार पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी केवळ जळालेल्या गाडीचे अवशेष उरले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, त्यातून आगीची भीषणता स्पष्टपणे दिसून येते.

ज्या खासदारांच्या कारला आग लागली ते लुंबा रामजी चौधरी असून ते राजस्थानमधील जालोर-सिरोही मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ते वाशिम येथील दौरा आटोपून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात होते. त्यांच्या सोबत काही सहकारी देखील कारमध्ये होते. शहापूर येथील अनिल बबन जाधव हे चालक कार चालवत होते.
नाशिकजवळील गोंदे फाटा परिसरात आल्यानंतर चालकाला गाडीतून जळाल्यासारखा वास येऊ लागला. इंजिनमधून धूर निघताना दिसताच त्यांनी तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली. प्रसंगावधान राखत त्यांनी खासदार आणि इतर प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच आगीने भयानक रूप धारण केले आणि संपूर्ण कार जळू लागली.
आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. स्थानिक अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून गेली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे दिलासादायक आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.





