Ashok Kharat Case : नाशिक : नाशिकमधील ज्योतिष अशोक खरात (Ashok Kharat Case) याने अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. खरातने 150 पेक्षा जास्त महिलांचे शोषण केल्याचा आरोप असून, पोलिसांच्या हाती 58 व्हिडिओ लागले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारनेच याचा भांडाफोड केला आहे. अनेकदा सामाजिक दबावामुळे पीडित महिला पुढे येत नाहीत, परंतु आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धीर देऊन समोर येण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू असून मी स्वतः पोलीस महासंचालकांना यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या गुन्ह्यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. केवळ एखाद्या व्यक्तीला भेटले म्हणून कोणावर कारवाई करणे चुकीचे आहे. जर कोणाचे नाव विनाकारण ओढले जात असेल तर ते योग्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात खरातच्या फार्म हाऊसला पाणी दिले गेले, यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या गोष्टींची चौकशी करायची की नाही ते नंतर पाहू, पण सध्या महिलांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे.
अशोक खरात याचे काही बड्या अधिकाऱ्यांशी संबंध होते आणि त्यातून त्याने मोठी संपत्ती तसेच जमिनी जमा केल्याचे आरोप होत आहेत. यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाईल. आम्हाला राजकारण करण्यात रस नसून महिलांचा आत्मसन्मान जपण्याला आमचे प्राधान्य आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.







