छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे अमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना २१ जुलै रोजी समोर आली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एकावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश बाबुलाल पांडे (३५ रा. राजा बाजार) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२२ ते ५ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे.
गिता (नाव बदलले) आणि राकेश यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर राकेशने गिताला मार्च २०२२ मध्ये मिटमिटा येथे एका हॉटेलमध्ये नेले. तिथे विश्वासात घेऊन आपण लग्न करू. तुझ्यासोबत पत्नीचे संबंध ठेवतो. तुझ्या मुलीला देखील आपण सांभाळू, असे आमिष दाखवले. त्यानंतर राकेशने शारीरिक संबंध ठेवले. १५ जुलै २०२४ रोजी गिता यांनी राकेश यांना लग्न कधी करणार असे विचारले. यावेळी तुझ्याशी कोण लग्न करणार आहे, असे म्हणत शिविगाळ केली. त्यादिवशी पासून राकेशने गिताशी पूर्णपणे बोलणे बंद केले.
१७ जुलै रोजी गिता राकेशला मोंढा नाका येथे भेटायला गेल्या. परंतु, राकेश तिथे नव्हता. त्यामुळे, गिताला आपल्यासोबत धोका झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गिताने विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. गितावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गिताच्या तक्रारीवरून राकेश याच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.