Police Bharati : छत्रपती संभाजीनगर : पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एका 23 वर्षीय तरुणाचा भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. लोहमार्ग पोलीस भरतीअंतर्गत सुरू असलेल्या शारीरिक चाचणीदरम्यान 1600 मीटर धावण्याची चाचणी देताना ही घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे भरतीसाठी आलेल्या इतर उमेदवारांमध्ये तसेच पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव संग्राम शिंदे असून तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता. पोलीस भरतीसाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. शनिवारी सकाळी भरती प्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू होती. संग्रामनेही इतर उमेदवारांसोबत 1600 मीटर धावण्यास सुरुवात केली. तो चांगल्या वेगाने धावत होता. मात्र धाव पूर्ण होण्याच्या काही क्षण आधी त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला.
ही घटना लक्षात येताच तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेतली. संग्रामला त्वरित शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला होता.
संग्राम हा घरातील कर्ता मुलगा होता. पोलीस बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अनेक महिन्यांपासून मेहनत घेत होता. दररोज सराव करून त्याने स्वतःला तयार केले होते. मात्र भरतीच्या मैदानातच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, संग्रामच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या आरोग्य तपासणीबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.







