पुणे: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या (Maharashtra ZP Election) निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक (Pune ZP Election) कार्यक्रम जाहीर करताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून तयारी करत असलेल्या इच्छुक उमेदवारांची धावपळ आता सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

या निवडणुकांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत होणार आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्च मर्यादाही जाहीर केली आहे. 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपये खर्च करता येणार असून पंचायत समिती उमेदवारांसाठी ही मर्यादा 6 लाख रुपये आहे. 61 ते 70 विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार रुपये आणि पंचायत समितीसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. 50 ते 60 विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महिलांसाठी 369 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा राखीव आहेत. पंचायत समित्यांमध्ये एकूण 125 समित्यांसाठी 1462 जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये महिलांसाठी 731, अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा राखीव आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार 16 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी निवडणूक सूचनेची प्रसिद्धी करतील. 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 27 जानेवारी ही उमेदवारी माघारीची अंतिम तारीख असून त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल.
या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता कोणाची राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






