बीड: सावरगाव घाट येथे भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava Beed) यंदा अभूतपूर्व गर्दी झाली. पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, पूजा व आरती केली. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तसेच आमदार लक्ष्मण हाकेही (Lakshman Hake) उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडेंनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहिण मंत्री आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पंकजाने पुढाकार घ्यायलाच हवा,” असं ते म्हणाले. दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा आठवून त्यांनी सांगितलं की, भगवान गडाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दसऱ्याच्या दिवशी केलं होतं आणि त्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या मेळाव्याला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं.

“आज पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली जमलेली गर्दी ही आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. साहेब गेल्यानंतर अनेक संकटं आली, पण पंकजाताईंनी परंपरा जपली. मला माझ्या बहिणींचा अभिमान आहे,” असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. आपल्या राजकीय प्रवासातील अडचणींवर भाष्य करताना त्यांनी शेरोशायरीतून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणावर बोलताना धनंजय मुंडेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही त्या चळवळीत होतो. पण काही ठरावीक लोक ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसींचा कट-ऑफ 485 आहे, स्पेशल विकर सेशनचा 450 आहे. कुणाला फसवण्याचा प्रयत्न होतोय, हे चुकीचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा माझ्याविरोधात मीडिया ट्रायल झाली, तेव्हा पंकजानेच मला आधार दिला. कोर्टातून मला क्लिनचिट मिळाली आणि तक्रारदारावरच 1 लाखाचा दंड झाला.” समाजातील तणावाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितलं की, “जाती-पातीच्या नावाने समाजात फूट पाडली जातेय. हे वातावरण मोडायचं आहे. शिक्षणाशी जोडलेला समाज हा आपल्या ताकदीचा आधार आहे.”
शेवटी आपल्या शायरीतून त्यांनी उपस्थितांना विचार करायला लावलं “आग लगी थी मेरे घर, सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये… एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैंने कहा कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ…” या शायरीनं मेळाव्यातील वातावरण भारावून टाकलं. बीड जिल्ह्यातील या दसरा मेळाव्यातील पंकजा आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित उपस्थिती ही विशेष ठरली असून, स्थानिक जनतेत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.







