Crime News: लातूर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी भावाला अटक (Arrest) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कासार शिरशी परिसरातील रामलिंग मुदगड येथे बुधवारी सकाळी गुलाब विलास खरोसे या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह शेताच्या बांधावर आढळून आला होता. ही घटना संशयास्पद असल्याने वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. सुरुवातीला या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या प्रकरणाचा तपास करताना कासार शिरशी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध बाजूंनी तपास करत होते. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी मयताचा भाऊ उल्हास विलास खरोसे याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीच्या वाटणीवरून दोघा भावांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद वाढत गेल्याने आरोपी उल्हास याने मंगळवारी रात्री आपल्या भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेतात टाकून तो घरी परतला. सुरुवातीला त्याने पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उल्हास खरोसे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.







