नांदेड: नांदेड (Crime News) जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एकाच कुटुंबातील ४ जणांनी आपला प्रवास संपवला आहे. या घटनेत २२ ते ५१ वर्षे वयोगटातील सदस्यांचा समावेश असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये यामुळे भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच घरातील चार लोकांच्या अशा जाण्याने गावकरी आणि पोलीस यंत्रणाही थक्क झाली होती. दरम्यान, घटनेचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.

या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. यामध्ये ५१ वर्षीय वडील रमेश सोनाजी लखे आणि ४५ वर्षीय आई राधाबाई रमेश लखे यांचा समावेश असून, त्यांचे मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मिळाले. तर त्यांची दोन मुले, २५ वर्षांचा उमेश रमेश लखे आणि २२ वर्षांचा बजरंग रमेश लखे यांचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः या गावाला भेट देऊन लखे कुटुंबाच्या घराची आणि घटनास्थळाची पाहणी केली. सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. तसेच कुटुंबात सातत्याने असणारे आजारपण आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी सर्व मृतदेहांचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आर्थिक संकटामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.







