Accident News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ओअॅसिस चौकात सोमवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात आशा दिलीप ढाकरके या महिलेचा जागीच मृत्यू झाला. आईचा असा अचानक डोळ्यांसमोर मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि अपघाताच्या भीषणतेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकावर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा ढाकरके वय 45 या रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी होत्या. त्या पती दिलीप ढाकरके आणि मुलगी नेहा यांच्यासोबत उपचार घेऊन दुचाकीवरून घरी परतत होत्या. दुचाकी क्रमांक एमएच 20 सीडी 7460 अशी होती. दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास ते ओअॅसिस चौकात पोहोचले असता सिग्नल लाल असल्याने दिलीप ढाकरके यांनी दुचाकी थांबवली.
याचवेळी पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरचा क्रमांक एमएच 46 बीयू 2398 असा असल्याची माहिती आहे. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की आशा ढाकरके रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि थेट कंटेनरच्या चाकाखाली आल्या. काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर रक्त सांडले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पत्नीचा असा भीषण अंत पाहून दिलीप ढाकरके यांना मोठा धक्का बसला. ते पूर्णपणे हादरून गेले होते. मात्र या गंभीर प्रसंगात त्यांची 18 वर्षांची मुलगी नेहा खंबीरपणे उभी राहिली. तिने आईचा श्वास तपासला, आई आपल्यातून निघून गेल्याचे समजताच ती कोसळली नाही. तिने वडिलांना मिठी मारत धीर दिला. हा प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






