रायगड : खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली फाटा परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका कामगाराची लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

मृत कामगाराचे नाव दिनेश कुशवा, तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामसहाय कालीप्रसाद पाल असे आहे. दोघेही मजुरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाली फाटा येथील जेपी पॅलेस हॉटेलजवळील एका रिकाम्या गाळ्यात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती खोपोली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली. तपासादरम्यान रामसहाय कालीप्रसाद पाल याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या तपासानुसार, दिनेश कुशवा आणि रामसहाय पाल हे दोघे मध्यरात्री एकत्र बसून मद्यपान करत होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या रामसहायने जवळ पडलेला लाकडी दांडका उचलून दिनेशच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेला दिनेश रिकाम्या गाळ्यात कोसळला. रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. विशाल नेहूल यांनी दिली असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.







