अलिबाग: रायगड (Crime News) जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे एका धक्कादायक सत्याने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी पोटदुखीचा त्रास झाला आणि रुग्णालयात गेल्यावर ती ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

साखरपुड्याच्या ‘त्या’ रात्री उडाली खळबळ
पीडितेच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले होते. २४ फेब्रुवारीला विवाह होणार होता. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. मात्र, ७ जानेवारीच्या रात्री मुलीला असह्य पोटदुखी सुरू झाली. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
पीडित मुलगी आणि आरोपी समीर नारायण नाईक (वय २०) यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र, आरोपी समीरने जानेवारी २०२५ पासून पीडितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
या गंभीर प्रकारानंतर कुटुंबाने रेवदंडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी कारवाई करत आरोपी समीर नाईक याला अटक केली. त्याच्यावर पोक्सो (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलगी अवघ्या १५ वर्षांची (अल्पवयीन) असताना तिचे लग्न का लावून दिले जात होते? ‘बालविवाह’ हा कायद्याने गुन्हा असूनही समाजात ही प्रथा अजूनही सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्यात आली कि नाही? याबद्दल अधिक माहिती समोर आली नाही.





