पुणे: महिला विश्वचषकाच्या (ICC Women’s World Cup) उपांत्य फेरीत भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. हा विजय केवळ ऐतिहासिक आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 339 धावांचे आव्हान भारताने 9 चेंडू बाकी असताना सहज पार केले. विश्वचषकाच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची ही पहिलीच यशस्वी नोंद आहे. ऑस्ट्रेलिया गेल्या 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच विश्वचषकातील सामना हरला आहे. ज्यामुळे या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

जेमिमाचा अविस्मरणीय पराक्रम
रोमांचक सामन्याचा खरा हिरो जेमिमा रॉड्रिग्ज ही ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करत 127 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तिच्या या धडाकेबाज इनिंगमुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता. जेमिमाने 134 चेंडूंमध्ये 14 चौकार मारत 94.78 चा जबरदस्त स्ट्राइक रेट राखत 127 रन बनवले . विशेष म्हणजे, ही तिची वनडे कारकिर्दीतील तिसरी सेंच्युरी असून, तिन्ही शतके तिने याच वर्षी पूर्ण केली आहेत.
हरमनप्रीतचा संयमी आधार
सुरुवातीला दोन-तीन गडी लवकर बाद झाल्याने संघावर दबाव आला होता. अशा वेळी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महत्त्वपूर्ण साथ दिली. हरमनप्रीतने 89 धावा केल्या आणि जेमिमासोबत शतकी भागीदारी रचून संघाला स्थैर्य दिले. दरम्यान, भारताने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर विजय निश्चित झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज भावनिक झाली आणि तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. तिच्या या शानदार खेळासाठी तिला ‘Player of the Match’ चा पुरस्कार मिळाला.







