पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतीच हवेली तालुक्यातील खेडशिवापूर येथील श्रीरामनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या वाडकर कुटुंबावर शुल्लक कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काल रात्री (११ जून) घरात घुसून हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मोटरसायकल लावण्याच्या वादावरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेबाबत अदिनाथ शंकर वाडकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, हल्लेखोर अर्जुन प्रमोद रजपूत, रोहन रजपूत, तेजस रजपूत, करण रजपूत (सर्व रा. शिवापूर) व त्यांच्यासोबत आलेले दोन ते तीन अनोळखीच्या लोकांनी घरात जबरदस्तीने घुसून मुलगा लोकेश यांना शिवीगाळ करत कोयता, लोखंडी सळई व लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. सोबतच मलाही मारहाण केली अशी तक्रार त्यांनी दिली आहे. या घटनेत लोकेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, लोकेश आणि आरोपींमध्ये आधी मोटारसायक पार्क करण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







