राहुलकुमार अवचट

Yawat : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत पोलीस स्टेशन हद्दीतील वरवंड येथे एटीएम मशीन सह सुमारे ७ लाख ८३ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी बस स्टॅन्ड जवळ असलेल्या अब्दुल पटेल यांच्या खाजगी जागेत असलेल्या पत्र्याच्या गळ्यातील वन इंडिया कंपनीचे ७० हजार रुपये किंमतीचे एटीएम मशीन व एटीएम मध्ये असलेली सुमारे ७ लाख १३ हजार ३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८३ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तींनी ओढून चोरून नेल्याची फिर्याद इंडिया वन पेमेंटचे धनंजय शिंदे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली असून यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत आहेत






