राहुलकुमार अवचट

Yavat News: यवत, ता. 18 : दौंड तालुक्यातील पाटस हद्दीतील भागवतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (ता. 16) शाळा सुरू असताना थेट वर्गात दोन सापांनी प्रवेश (Two snakes entered a classroom) केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी प्रचंड भयभीत झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
राज्य सरकारकडून विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून अनेक जिल्हा परिषद शाळा बंद केल्या जात असताना, दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या शाळांनाही सुरक्षित इमारती व वर्गखोल्या उपलब्ध नसल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. त्यातच दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत असताना वाड्या-वस्त्यांवरील शाळांतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत यावे लागत आहे.
भागवतवाडी येथील या शाळेला संरक्षण भिंत नसून शाळेतील वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. मंगळवारी वर्ग सुरू असताना अचानक दोन साप दिसताच विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. शिक्षकांनी तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधून सापांना सुरक्षितरित्या पकडून बाहेर काढले. साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी पुन्हा असा प्रकार घडण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
या शाळेत केवळ दोन जुन्या खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरवले जातात. याच खोल्यांमध्ये कार्यालयीन कामकाज, दप्तर साठवण आणि अध्यापन सुरू आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी संख्या अधिक आहे; मात्र अपुऱ्या आणि कालबाह्य खोल्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासकीय नियमानुसार या खोल्या वापरण्यास मनाई असतानाही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून किरकोळ डागडुजी करून त्याच खोल्यांत वर्ग सुरू ठेवावे लागत आहेत.
कालबाह्य दगडी बांधकाम ठिसूळ झाले असून भिंतींना ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. प्रशासन व राजकीय नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या खोल्या पाडून नवीन इमारत उभारण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
दरम्यान, पालकांकडून तातडीने नवीन सुरक्षित वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली असून प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका खुडेजा शेख यांनी सांगितले की, “शाळेच्या वर्गखोल्या सन 1950 मध्ये बांधण्यात आल्याची नोंद कार्यालयात उपलब्ध आहे. जीर्ण व धोकादायक खोल्या पाडून नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.






