पिंपरी-चिंचवड : शहरात वाहन तोडफोडीच्या घटनांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

सदर घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली असून, टोळक्याने सिमेंटच्या गट्टूने सहा चारचाकी वाहनांची आणि तीन रिक्षांची काचा फोडल्या. वाहनांची ही तोडफोड नेमकी का करण्यात आली, हे अद्याप अस्पष्ट आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली आहे. प्राथमिक तपासात पाच जणांच्या टोळक्याने ही कृत्य केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी त्यापैकी दोघांना अटक केली आहे.
सर्वसामान्य नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करतात. मात्र, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती वाहनांना लक्ष्य करून नागरिकांचे आर्थिक नुकसान करत आहेत. यापूर्वीदेखील पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, पोलिसांनी त्या प्रकरणांमध्ये कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या टोळक्यांचा उद्देश धुडगूस घालून वाहनांची तोडफोड करणे आणि परिसरात दहशत निर्माण करणे, असा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या इतर तिघांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी तपास करत आहेत.







