पुणे: महाराष्ट्रातील नद्या, कालवे आणि धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे आता हटवली जाणार आहेत. या अतिक्रमणांमुळे अनेक अवैध बंगले, घरे आणि हॉटेल-रेस्टॉरंट्स बांधली गेली आहेत. पुण्यात झालेल्या एका बैठकीनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. खडकवासला धरण परिसरात अशी अनेक अतिक्रमणे झाली आहेत. अवैध बंगले, घरे आणि हॉटेल-रेस्टॉरंट्सचे सांडपाणी थेट धरणांमध्ये मिसळून पाण्याचे स्रोत दूषित करत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, जलसंपदा विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती देतांना सांगितले कि, ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधून सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे.

कशी असेल ही मोहीम?
- ड्रोन सर्वेक्षण: सर्वात आधी ड्रोन वापरून संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. यामुळे अतिक्रमणांची अचूक माहिती मिळेल.
- सीमारेषा निश्चिती: जलसंधारण विभागामार्फत धरणांच्या आणि कालव्यांच्या अचूक सीमारेषा मोजल्या जातील.
- अतिक्रमण हटाव: महानगरपालिका आणि संबंधित विभागांच्या मदतीने धरण परिसरातील ही अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाईल.
या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील जलस्रोत स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि भविष्यात पाण्याचे प्रदूषण टाळता येईल.







