पुणे : हवेली तालुक्यातील फुलगाव गावातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या ८ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली. याच वेळी बैल पळत सुटला आणि त्या दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने हवेली तालुक्यात शोककळा पसरली आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय-८) असं मृत्यू झालेल्या चिमुलकल्याचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शौर्य हा अंगणात खेळत असताना त्याने अंगणातील बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली. त्यावेळी बैल घाबरल्याने तो पळत सुटला आणि या दोरीने शौर्यच्या गळ्याभोवती आणि अंगावर फास बसला. त्यामुळे तो बैलाच्या मागे दोरीमुळे फरपटत गेला. काही अंतरापर्यंत त्याला बैलाने फरपटत नेले. या घटनेत त्याला जबर मार लागला.
बाहेर कसला तरी आवाज आल्याने त्याचे पालक धावत बाहेर आले. शौर्यला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्य हा फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.