लोणी काळभोर : पाचर्णे मळा (ता. शिरूर) परिसरातील घोडनदीपात्रात ३१ जानेवारी २०२४ रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गूढ उकलून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आले आहे. ‘जमीन विक्री करा’ म्हणून भांडण करत असल्याने सख्खा भाऊ व चुलत्याने हा खून केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.
कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२, रा. आनंदगाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत. तर अजिनाच गोकूळ विघ्ने (वय २६), पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय ५०, दोघे रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड), गणेश प्रभाकर नागरगोजे (वय २९, रा. एकलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ असलेल्या नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतास मारहाण करून, त्याचे हात-पाय बांधून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत टाकून देवून त्याचा खून केला असावा, असा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्हा तत्काळ उघडकीस आणून, आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस समांतर दिशेने करीत होते.
दरम्यान, संबंधित प्रकार हा खुनाचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. मृतदेह नदीपात्रातील पाण्यात आढळल्याने चेहऱ्यावरून ओळख पटविणे अवघड होते; परंतु स्थानिक गुन्हे पथकाने मृतदेहाची ओळख पटवली. तपासात मृताचे नाव कृष्णा विघ्ने असल्याचे निष्पन्न झाले.
यागुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, मृत कृष्णा विघ्ने याचा भाऊ अजिनाथ गोकूळ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने व गणेश नागरगोजे यांनी हा खून केला आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना शिरूर कासार येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. मृत कृष्णा हा व्यसनी होता. तो ‘कुटुंबात जमीन विक्री करा,’ असे म्हणून भांडण करत असे. या कारणास्तव आरोपींनी त्याचा खून केल्याचे कारण तपासात पुढे आले आहे. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमोण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश चिगळे तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटोल, पोलीस अंमलदार अरूण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विको यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे.