लोणी काळभोर, ता. 7: पुणे शहरालगत कदमवाकवस्ती हे गाव असल्याने येथील नागरिकीकरणासह शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. म्हणून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. तसेच जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 89 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र या योजनेसाठी हा निधी कमी पडणार होता. म्हणून प्रशासनाकडे वाढीव निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन, या योजनेसाठी सुमारे 142 कोटींच्या निधीला तांत्रिक मंजुरी दिली आहे. अशी माहिती माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दिली आहे.

कदमवाकवस्ती गावाला जलजीवन योजने अंतर्गत 89 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या मंजूर योजनेतून पाण्याची वितरण व्यवस्था ही केवळ कदमवाकवस्ती येथील वार्ड क्र. 1 व 6 मध्ये करण्यात येणार होती. त्यामुळे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होणार नव्हता. त्यामुळे सरपंच चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हालचाली केल्या. गावातील प्रत्येक नागरिकाच्या घरी पाणी मिळाले पाहिजे. कोणतेही घर पाण्याविना वंचित राहू नये. यासाठी वाढीव निधीचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठविला होता.
दरम्यान, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील साठवण तलावाच्या दोन्ही बाजूंनी कॅनॉल असल्यामुळे मुळ मंजूर प्रकल्प अहवालामध्ये असलेली ओपन ब्लास्टिंगच्या परिमाणाचे विभाजन ब्रेकरद्वारे ब्लास्टिंग आणि उत्खनन नियंत्रनामध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे ब्रेकरद्वारे ब्लास्टिंग आणि उत्खनन नियंत्रनाच्या परिमाणात वाढ झाली आहे. साठवण तलावाच्या दोन्ही बाजूस कॅनॉल असल्याने साठवण तलावामध्ये सातत्याने पाणी झिरपते. त्यामुळे मंजूर योजनेतील डिवॉटरिंगची तरतूद पुरेशी नाही. त्यामुळे त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
आता सुधारित योजनेतून कदमवाकवस्ती गावातील उर्वरित वार्ड क्र 2, 3,4 व 5 येथील वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यानुसार योजनेतील वितरण व्यवस्थेतील पाईपलाईन लांबीत 35.5 किलोमीटर वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी 142 कोटी 31 लाख 77 हजार 300 रुपयांची ( 18 % GST व भाववाढ सह) तांत्रिक मंजूरी देण्यात येत आहे. असे पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे यांनी एका परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
यावेळी बोलताना माजी चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, गावातील प्रत्येक घरात पाणी मिळावे. यासाठी तळमळ सुरु आहे. त्यामुळे शासनाची जलजीवन मिशन योजना ही गावासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणीही अडथळा आणून काम बंद करू नयेत. तसेच नागरिकांच्या काही समस्या अथवा अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा. मी निपक्षपणे सोडविण्याचा प्रयत्न करतो.







