Solapur Crime : सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात वडिलांचा मुलाने खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेती विकण्याचा निर्णय आणि लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रमेश बट्टू कुंभार (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी त्यांचा मुलगा अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे पाटील मळा परिसरात सोमवारी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मृताची पत्नी समाबाई रमेश कुंभार यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कुंभार यांच्या नावावर सुमारे 4 एकर शेती होती. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही शेती विकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मुलगा अतुलच्या लग्नाच्या विषयावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. या कारणांमुळे काही दिवसांपासून घरात तणावाचे वातावरण होते.
सोमवारी रात्री रमेश कुंभार हे शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अतुल कुंभार तेथे पोहोचला. रागाच्या भरात त्याने लोखंडी पाइपने वडिलांवर हल्ला केला. डोक्यावर, तोंडावर आणि पायावर केलेल्या जोरदार मारहाणीमुळे रमेश कुंभार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी घरी आला आणि आईसमोर रडू लागला. वडिलांनी कर्ज केले आहे, शेती विकत आहेत आणि माझे लग्न लावत नाहीत, या रागातून हा प्रकार केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी अतुल कुंभार याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







